ठाणे खाडीत अवैध रेती उपसा, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त


June 8, 2026

महसूल, वन विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या भरारी पथकाने केलेल्या या संयुक्त कारवाईत बार्ज, सक्शन पंप आणि रेतीसह तब्बल ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

ठाणे : ठाणे येथील खाडीमध्ये नागलबंदर भागात अवैधरित्या रेती उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुकुर्हेनी रोख आणि पप्पा कोळी या दोघांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पथकाने ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महसूल, वन विभाग तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून ठाणे खाडीत भरारी पथकाद्वारे कारवाई केली जात आहे.

शुक्रवारी दुपारी कर्मचाऱी ठाणे खाडीत गस्ती घालत असताना नागाल बंदर खाडी पात्रात एक बार्ज अंदाजे १३ ब्रास रेतीसाठ्यासह भरलेली आढळून आली. पथकाने बार्जमध्ये काम करणाऱ्या सुकुर्हेनी रोख याची चौकशी केली असता, त्याने ही बार्ज भिवंडी येथील कालेर भागातील पप्पा कोळी या व्यक्तीची असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने रोख याला ताब्यात घेऊन बार्ज गणेश विसर्जन घाटाजवळ आणली. तसेच सक्शन पंप गॅस कटरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आले.

या कारवाईत पथकाने

३० लाख रुपये किमतीची बार्ज, १० लाख रुपयांचे सक्शन पंप आणि ६६ हजार ५२० रुपये किमतीची १३ ब्रास रेती असा एकूण ४० लाख ६६ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. या तक्रारीच्या आधारे, शनिवारी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १५(१), सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ कलम ३,७, खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम, १९५७ चे कलम २१, ३, ४, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८ (७), ४८ (८) आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम ३ (५), ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.



Source : www.loksatta.com


To Know More About Latest Thane City News Visit Thaneweb.com