मेगाब्लॉकचा फटका; कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, अनेक गाड्या ३ ते ५ तास उशिराने
June 15, 2026
शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर झालेल्या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वेवरील गाड्यांवरही झाला. पनवेलमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा बराच उशिराने पोहोचल्या.
ठाणे : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक आणि कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे येणाऱ्या तसेच कोकण आणि दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या तीन ते पाच तास उशिराने धावत असल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यातच सोमवारपासून (१५ जून) कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याने प्रवासकाल वाढण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासनासमोर वेळापत्रक पाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर झालेल्या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वेवरील गाड्यांवरही झाला. पनवेलमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा बराच उशिराने पोहोचल्या. रविवारी नियमित वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास पनवेल स्थानकात दाखल होणारी मुंबई-गोवा जनशताब्दी एक्सप्रेस पहाटे तीनच्या सुमारास पोहोचल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. याशिवाय मंगळूर, करमळी, मडगाव, तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम आणि इतर दक्षिणेकडील गाड्यांनाही मोठा विलंब झाला.
कोकण रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मध्य रेल्वे प्रशासनातर्फे शनिवार-रविवार घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब झाला. गाडी आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचल्यावर तिथून पुन्हा सुटेपर्यंत विलंब लागल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कोकण रेल्वे मार्गाचा बहुतांश भाग एकेरी असल्याने एखाद्या गाडीला विलंब झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण मार्गावरील वाहतुकीवर होतो. अनेक ठिकाणी क्रॉसिंगसाठी गाड्यांना थांबावे लागते. त्यामुळे एका गाडीचा विलंब पुढील अनेक गाड्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, हा विलंब काही काळापुरता असून कोकण रेल्वेचे वेळापत्रक नियमित करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोकण रेल्वेने १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू केले आहे. २० ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गाड्यांचा प्रवासकाल वाढविण्यात आला आहे. घाट विभागातील तीव्र उतार, मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि कमी दृश्यमानता लक्षात घेऊन काही ठिकाणी वेगमर्यादा कमी करण्यात आल्या आहेत. परिणामी काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्ग हा पावसाळ्यात देशातील सर्वाधिक संवेदनशील रेल्वेमार्गांपैकी एक मानला जातो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात दरवर्षी अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि रुळांवर माती-दगड येण्याच्या घटना घडतात. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासन दरवर्षी विशेष पावसाळी वेळापत्रक लागू करते. यंदाही संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त पथके, आपत्कालीन यंत्रणा, भूस्खलन निरीक्षण व्यवस्था आणि नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
मात्र, प्रवाशांमध्ये वाढती नाराजी दिसून येत आहे. उन्हाळी सुटीनंतर आणि पावसाळी पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच गाड्यांचा वाढलेला विलंब अनेकांच्या नियोजनावर परिणाम करत आहे. विशेषतः गोवा आणि कोकणातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांना तसेच कामानिमित्त मुंबईत ये-जा करणाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.
९० टक्क्यांहून अधिक मार्ग अजूनही एकेरी
कोकण रेल्वेचा रोहा ते थोकूर हा सुमारे ७४० किलोमीटरचा मार्ग देशातील महत्त्वाच्या रेल्वेमार्गांपैकी एक असला तरी त्यातील ९० टक्क्यांहून अधिक भाग अजूनही एकेरी आहे. त्यामुळे एका दिशेची गाडी पुढे जाण्यासाठी दुसऱ्या दिशेच्या गाडीची प्रतीक्षा करावी लागते. पावसाळ्यात वेगमर्यादा कमी झाल्यानंतर ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. रेल्वे तज्ञांच्या मते, मार्गाचे टप्प्याटप्प्याने दुपदरीकरण झाल्यास वेळपालनात मोठी सुधारणा होऊ शकते.
Source : www.loksatta.com
To Know More About Latest Thane City News Visit Thaneweb.com


Contact Us