साथीच्या रोगांविरोधात ठाणे महापालिका सतर्क; विशेष पथके तैनात, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
June 7, 2026
मान्सूनच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे.
ठाणे : पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. डेंग्यूसह विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे. साथ रोग रोखण्यासाठी शहरभर जनजागृती मोहीम राबविण्याबरोबरच डासांची पैदास आढळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा इशाराही पालिकेने दिला आहे.
मान्सूनच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉईड, काविळ आणि हापण यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने पाऊले उचलली आहेत. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने यंदा डास नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. फायरब्रिगेड विभाग, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षकांची विशेष पथके तयार करण्यात आली असून ही पथके विविध भागांमध्ये पाहणी करून डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेणार आहेत. तसेच नागरिकांना आवश्यक सूचना देऊन रोगप्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देणार आहेत.
ठाणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, गृहनिर्माण संस्था आणि प्रमुख रस्त्यांवर महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर भित्तीपत्रके, फलक आणि जाहिरात फलक लावण्यात येणार आहेत. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने देखील रोगप्रतिबंधक उपाययोजनांची माहिती असलेली पत्रके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात नागरिकांनी स्वतःच्या परिसरात स्वच्छता राखून डासांची पैदास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे.
विशेषतः: उघड्यावर पडून असलेले जुने टायर्स, पाण्याचे पिंप, बांधकामस्थळी साचलेले पाणी, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे आणि इतर वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होते. अशा ठिकाणी डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे डास आढळल्यास संबंधित दुकानदार, व्यावसायिक किंवा मालमत्ताधारकावर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्याच्या काळात ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर संसर्गजन्य लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घरगुती उपचारांवर भर देऊ नये. तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयात किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. डेंग्यू, मलेरिया, काविळ, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या साथीच्या रोगांची माहिती आरोग्य विभागाला त्वरित कळविल्यास वेळेत उपाययोजना करता येतील, असेही प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. रक्त तपासणी, निदान आणि उपचारांसाठी आवश्यक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना विशेष सूचना देण्यात आल्या असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून किंवा गाळून वापरावे, पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी, पाणी साठविणाऱ्या भांड्यांना झाकण ठेवावे, उघड्यावर ठेवलेले अवशेष टाळावेत तसेच परिसरात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. गृहनिर्माण संस्था परिसर, गच्ची आणि घराभोवती पडून असलेल्या टायर्स, नारळाच्या करवंट्या आणि रिकाम्या डब्यांची तातडीने विल्हेवाट लावावी, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. डेंग्यूसह विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून साथ रोग रोखण्यासाठी शहरभर जनजागृती मोहीम राबविण्याबरोबरच डासांची पैदास आढळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच साथीचे रोग रोखण्यासाठी केवळ आरोग्य विभागाच्या उपाययोजना पुरेशा नाहीत. नागरिकांनीही स्वच्छता आणि आरोग्याबाबत जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी केले आहे.
Source : www.loksatta.com
To Know More About Latest Thane City News Visit Thaneweb.com


Contact Us