ठाणे जिल्ह्यात २८ जूनला पल्स पोलिओ मोहिम; सुमारे दोन लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट १,८७८ बूथ, १,३४७ घरभेट पथके सज्ज

June 12, 2026

लसीकरणासाठी जिल्ह्यात १,५७८ बूथ आणि १,३४७ घरभेट पथके, मोबाईल टीम सज्ज

ठाणे – पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी २८ जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी ठाणे जिल्ह्यात व्यापक तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी १,८७८ लसीकरण बूथ, १,३४७ घरभेट पथके, ट्रांझिट आणि मोबाईल पथके सज्ज करण्यात आली आहेत.

ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सुमारे १ लाख ९७ हजार ६९४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी लसीकरण बूथवर कामकाजासाठी ४ हजार ३४८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ३७४ पर्यवेक्षक देखरेख करणार आहेत. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी विशेष घरभेट मोहिमेचीही नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६९ हजार ७७३ घरांना भेटी देण्यासाठी १ हजार ३४७ पथके कार्यरत राहणार आहेत. या कामासाठी ५ हजार ३२३ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले असून २६३ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

बसस्थानके, रेल्वे स्थानके, तपासणी नाके आणि स्थलांतरित नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अशा ठिकाणी ६८ ट्रांझिट पथके कार्यरत राहणार असून त्यांच्यावर २७ पर्यवेक्षक देखरेख ठेवतील. तसेच दुर्गम भागांमध्ये सेवा पोहोचविण्यासाठी ८८ मोबाईल पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील ३६ आरोग्य संस्था सहभागी होणार असून ७६ वैद्यकीय अधिकारी आणि ३४ जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यावर लक्ष ठेवणार आहेत. लसीची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी ४ हजार २२५ कोल्ड चेन उपकरणे, १ हजार २९२ लस वाहक आणि ४ हजार ४७६ मार्कर पेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर नेण्याचे आवाहन केले आहे. तसेच घरभेटीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.



Source : www.loksatta.com


To Know More About Latest Thane City News Visit Thaneweb.com